
Pune News : कर्जाची नोंद सातबारावर करण्यासाठी लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – कर्जाची नोंद सातबारावर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पुणे जिल्ह्यातील खोडद गावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.
सुनील प्रभाकर राणे (वय 52, रा. जुन्नर, पुणे) असे पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राणे हा जुन्नर तालुक्यातील खोडद गावचा तलाठी आहे. यातील तक्रारदार यांनी सहकारी बँकेतून शेतीवर 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची नोंद सात बारावर करायाची होती व त्यासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता. यावेळी लोकसेवक सुनील यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा रचून तलाठी सुनील राणे यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
