Pune news: शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे. पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तातरांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत होऊ शकते.

पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे आमदार होते. ते सलग दोनवेळा निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील कोथरूडमधून विधानसभेवर निवडून आले. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर, मागीलवेळी थोड्या मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला संधी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे.

औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण, नागपूर पदवीधरचे भाजपचे अनिल सोले हे आमदार आहेत. तर, पुणे शिक्षक मतदारसंघाचे दत्तात्रेय सावंत आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांत देशपांडे हे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

असा आहे निवडणूक कार्यक्रम !

अधिसूचना व उमेदवारी अर्ज दाखल करणे- 5 नोव्हेंबर 2020

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- 12 नोव्हेंबर

उमेदवारी अर्जांची छानणी- 13 नोव्हेंबर

अर्ज माघार घेण्याची मुदत- 17 नोव्हेंबर

मतदानाची तारीख व वेळ- 1 डिसेंबर, सकाळी 8 ते सायंकाळी 5

मतमोजणी- 3 डिसेंबर 2020

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.