Pune News: घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील मंदिरे उघडणार, नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुणे शहर, पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या गुरुवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. नागरिकांनी मंदिरात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतची नियमावली महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केली आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून मंदिरे बंद होती. मंदिरे उघडण्याची मागणी विविध धार्मिक संघटना, विरोधी पक्षाकडून केली जात होती. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या गुरुवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. त्यासाठीची नियमावली पुणे महापालिकेने जाहीर केली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे गुरुवारपासून मंदिर व्यवस्थापन, ट्रस्ट, ऑथॉरिटीने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहतील. मंदिरात नागरिकांनी मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्डवॉशचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना देखील लागू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.