Pune news: साहित्य संमेलनासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दहा लाखाचा निधी

एमपीसी न्यूज – नाशिक येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होत आहे. या साहित्य संमेलनासाठी निधी कमी पडू नये यासाठी स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून निधी देण्याचे आवाहन करण्यात आला होते. यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दहा लक्ष रुपये निधी हा स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून देत असल्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन निधी तात्काळ वितरित करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

डॉ. गोऱ्हे यांना साहित्याचा खूप मोठा वारसा लाभला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून उरल्या कहाण्या या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक मिळाले आहे. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी, शाश्वत विकास उद्दिष्टे व स्त्री पुरुष समानता अशी 15 च्यावर काही पुस्तके त्यांनी स्वत: लिहिली आहेत व अनेक संपादित केली आहेत.

आमदार विकास निधीचा साहित्य संमेलनासाठी उपयोग व तो ही नाशिकच्या संमेलनासाठी करता येणे हा एक त्रिवेणी संगम आहे अशी भावना नीलम गो-हे यांनी व्यक्त केली आहे. बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांच्या घराण्याचा वारसा तर आई लतिका गोऱ्हे यांच्या परिवाराला कवी श्रीधर यांचा त्यांना वारसा आहे.

श्रेष्ठ कवी कै. विंदा करंदीकर हे त्यांचे सासरे तर ज्येष्ठ लेखिका, कवियत्री कै. विजया जहागीरदार या त्यांच्या आत्या लागतात, असा हा गोऱ्हे यांचा साहित्याचा वारसा आहे.

तसेच नाशिकचे आणि डॉ. गोऱ्हे यांचे खूप दृढ संबंध आहेत. त्यांचे वडील डॉ. दिवाकर गोऱ्हे यांचे व गोऱ्हे परिवाराचे मुळ गाव नाशिक असुन चांदवडची रेणुका देवी हे त्यांची कुलस्वामिनी आहे. साहित्य संमेलनासाठी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 50 लक्ष निधी जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.