Pune News : शहरातील रस्ते 10 जूनपर्यंत पूर्ववत करण्याची घोषणा हवेतच विरली

एमपीसी न्यूज – शहरातील रस्ते खोदाईची कामे पूर्ण करून 10 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. शहरातील रस्त्यांवर अद्यापही खोदाईची कामे सुरूच असून कामे पूर्ण होण्यास 20 जून उजाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी किमान आठवडाभर रस्तेखोदाईचा त्रास सहन करावा लागणार आहे.

पावसाळ्यापूर्वी सर्व खोदाईची कामे पूर्ण करून रस्ते पूर्वत करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. तसेच जे ठेकेदार दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणार नाहीत, पावसाळ्यापूर्वी जे रस्ते पूर्ववत करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा ईशारा दिला होता. मात्र आयुक्तांनी दिलेली मुदत संपली, पावसाळा सुरू झाला. तरीही शहरात विविध रस्त्यांवर खोदाईची कामे सुरूच आहेत. ड्रेनेज विभागाने बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमधील रस्त्यांवर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदाई केली आहे. या खोदाईचा चांगलाच त्रास लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांना भोगावा लागत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे सर्व रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरल्यानंतर आणि सर्वत्र राडारोडा, खोदाईने वाहतूक कोंडी झाल्यानंतर पालिकेने खोदाई थांबवत 10 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याची घोषणा केली.

मात्र, घोषणेला आठवडा उलटला, तरीही रस्त्यांची स्थिती जैसे थे आहे. अनेक ठिकाणी आजही जेसीबीने खोदाई सुरूच आहे. सध्याची परिस्थीती पाहता महापालिकेची घोषणा हवेत विरली असून ही कामे पूर्ण करण्यासठी संबंधित विभागांनी आणखी आठवडाभराची मुदत मागितली आहे. त्यामुळे पुणेकरांना किमान आठवडाभर रस्ते खोदाईचा त्रास सहन करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.