Pune News : अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद थांबेना; पुण्यातील पत्रकार परिषदेत प्राजक्ताने केले गंभीर आरोप

एमपीसीन्यूज : टेलिव्हिजन विश्वातील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सध्या चर्चेत आली आहे. मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिला डचू देऊन तिच्या जागी वीणा जगताप हिची निवड करण्यात आली आहे. यातूनच मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे.

अलका कुबल यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, प्राजक्ता गायकवाड अनेकदा सेटवर उशिरा यायची, त्यामुळे चित्रीकरणाला उशिरा सुरुवात होत असे. सीनियर कलाकार तासंतास तिची वाट पाहायचे. यावर उत्तर देताना प्राजक्ता गायकवाड हिनेही आज पुण्यामध्ये आपली बाजू मांडली.

पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना प्राजक्ता म्हणाली, मला मालिकेतून काढले नाही, मीच मालिका सोडली. मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली, माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप माझ्यावर झाला. त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत.

अलकाताई माझ्यासाठी आई सारख्या आहेत, मात्र, त्या नराधमांना पाठीशी घालताहेत. माझी बदनामी करत आहेत. त्यांच्या मुलींसोबत असे काही झाले असते तर अलकाताई अशाच वागल्या असता का ?, असा सवाल तिने उपस्थित केला.

मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले होते. माझ्यामुळे शूटिंग कधी थांबले नाही, असे प्राजक्ता म्हणाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.