Pune News : मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी करावी : राजेंद्र कोंढरे

कोरोना रुग्णांसाठी  उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स सुविधेमधील त्रुटींमुळे रायकर यांचा मृत्यू झाला. यंत्रणेतील या हलगर्जीपणाचा कोंढरे यांनी निषेध केला आहे.

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील वृत्तवाहिनीचे तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुणे शहरातील जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध यंत्रणा, सुविधा आणि वैद्यकीय सेवेचा दर्जा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.

यासंदर्भात कोंढरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, कार्डियाक ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने पुण्यातील ‘टिव्ही -9’ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला.

कोरोना रुग्णांसाठी  उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स सुविधेमधील त्रुटींमुळे रायकर यांचा मृत्यू झाला. यंत्रणेतील या हलगर्जीपणाचा कोंढरे यांनी निषेध केला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या अंमलबजावणीतील तळागाळातील वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कोविड हॉस्पिटलला भेट देणे तसेच या हॉस्पिटलमधील परिस्थिती जाणून गरजेचे आहे.

त्याचबरोबर कोरोनाच्या परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती या बाबत काही ठिकाणी फेर पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी जम्बो हॉस्पिटलसह जिल्ह्यात आणि महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर आणि रुग्णालयांमधील त्रुटी दूर कराव्यात.

तसेच खासगी रुग्णालयांमध्ये समन्वय साधून कोरोना रुग्णांचे मृत्यू होऊ नये या साठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणीही कोंढरे यांनी निवेदनात नमूद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.