Pune News : देशातील सर्वात ‘हायटेक’ लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी लोकसेवेत रुजू

जगातील चारही प्रगत रोबो प्रणाली आता पुण्यात एकाच रुग्णालयात उपलब्ध

एमपीसी न्यूज – जगातील चारही अतिप्रगत रोबो प्रणालींची सुविधा उपलब्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज (शनिवारी) झाले. जागतिक स्तरावर शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱ्या रोजा, कोरी, नॅव्हिओ व ब्रेनलॅप या चारही अत्याधुनिक रोबो प्रणाली उपलब्ध असलेले हे भारतातील एकमेव रुग्णालय असल्याने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

रुग्णालयाच्या उद्घाटनाचा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी https://fb.watch/6vVXwivMqx/ या लिंकवर क्लिक करा.

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील गोखलेनगर येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ अर्थात ‘लोकमान्य एचएसएस’ या हायटेक रुग्णालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत आयोजित केलेल्या या छोटेखानी समारंभास रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य तसेच डॉ. मिताली वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी या चारही रोबो प्रणालींचे प्रात्यक्षिक श्री. पवार यांच्या समोर सादर करण्यात आले.

जागतिक दर्जाचे स्पेशल सर्जरी रुग्णालय सुरू करण्यासाठी लोकमान्य रुग्णालयाने घेतलेल्या पुढाकाराचे श्री. पवार यांनी विशेष कौतुक केले. लोकमान्यच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले, याचा विलक्षण आनंद होतोय. गुणवत्ता आणि सामाजिक जाणीव यामुळे लोकमान्य हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात देशात नावलौकिक मिळवला आहे.

कोरोना सारख्या अवघड प्रसंगात लोकमान्य सारख्या संस्थालोकमान्य गुणवत्ता आणली तसेच सामाजिक भान ठेवले. त्यातून विस्तार होत गेला. वैद्यकीय क्षेत्रात पुणे हे महत्वाचे केंद्र बनले असून त्यात लोकमान्य रुग्णालयाचे योगदान मोठे आहे, असे पवार म्हणाले.

आजच्या प्रगत युगात या कुशल हातांना आणि कुशाग्र बुद्धीमत्तेला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळाली की “हायटेक ह्युमन’ असा सुसंगम होतो, हेच लोकमान्य सुपर सर्जरी हॉस्पिटलमध्ये जवळून अनुभवता येते. सुमारे पन्नास वर्षांची प्रदीर्घ वैद्यकीय सेवेची परंपरा असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलसने अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुमारे एक लाख रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. अस्थिरोगाच्या एक लाखाहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर, दीड लाखांहून अधिक अपघातग्रस्तांवर उपचार केले आहेत.

तसेच, गुडघेदुखीमुळे एकही पाऊल न टाकता येणाऱ्या लक्षावधी रुग्णांना स्वतःच्या पायावर चालण्याची ताकद दिली. अशी किमयागार गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळेच अस्थिरोगाचे कोणत्याही दुखणे म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल असे समिकरण गेल्या पन्नास वर्षात निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील रुग्णांच्या सोयीसाठी मुंबई, कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा विभागांमध्ये या रुग्णालयाच्या 22 बाह्य रुग्ण सेवा कक्ष कार्यरत आहेत.

एवढेच नव्हे तर लोकमान्य हॉस्पिटल्सचा विस्तार आता भारताबाहेरही केनिया, इथिओपिया व ओमान या देशांमध्ये झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याने लोकमान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जगभरातून रुग्ण येत असतात.

रुग्णसेवेचा हाच वारसा पुढे जपत पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौकात “लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ (एलएचएसएस) हे अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णसेवेचे केंद्र सुरू झाले आहे. या रुग्णालयातील 104 बेडमुळे आता लोकमान्य रुग्णालयाची एकूण क्षमता 450 बेडची झाली आहे.

जगातील सर्वोत्तम वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज लोकमान्य हे पुण्यातील अग्रगण्य हॉस्पिटल आहे. तसेच, या तंत्रज्ञानाने निपुण वैद्यकीय सेवा करणारे निष्णात डॉक्‍टर हे देखील या रुग्णालयाचे खास वैशिष्ट्य आहे. यंत्रमानव अर्थात रोबोच्या माध्यमातून सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे आधुनिक वैद्यकशास्त्राचे वरदान आहे. पाच वर्षांपूर्वीच पाश्‍चात्त्य प्रगत देशांमधील हे तंत्रज्ञान आता लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून थेट पुण्यात उपलब्ध झाले आहे.

अमेरिकेच्या बाहेर हे तंत्रज्ञान लोकांसाठी उपलब्ध होणारे हे आशियाई खंडातले पहिले केंद्र असून आजमितीला रोबोच्या सहाय्याने पाच हजारांहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे लोकमान्य हे तत्रंज्ञानाच्या बाबतीत खरोखरीच अग्रेसर म्हणून कार्यरत आहे. रोबोच्या मदतीने केलेल्या शस्त्रक्रियेत अत्यंत अचूकता साधली जाते. हे याचे वैशिष्ट आहे. जगातील सर्वोत्तम असे नॅव्हिओ, रोझा, कोरी आणि ब्रेनलॅप कॉम्प्युटर असिस्टेड नॅव्हिगेशन या तंत्रप्रणाली असलले लोकमान्य हाॅस्पिटल फाॅर स्पेशल सर्जरी हे देशातील एकमेव हाॅस्पिटल आहे.

कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या अस्थिरोगाबद्दलच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया इतकेच नाही तर, हृदयरोगावरील आव्हानात्मक शस्त्रक्रियांची सुविधा स्पेशल सर्जरी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्या आहेत. त्या बरोबरच डोळ्यांचे, हृदयाचे, मूत्रपिंडाचे, रक्तवाहिन्यांचे असे वेगवेगळ्या अवयवांवर उपचार व स्पेशल सर्जरी येथे केल्या जातात.

मागील दहा-वीस वर्षांपासून आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये अमूलाग्र बदल झाले. त्यातून यकृत, मूत्रपिंड याचे विकार वेगाने वाढले. या सर्वांवर एकाच ठिकाणी प्रभावी उपचार करता येतील, अशा प्रगत केंद्राची पुणेकरांच्या आरोग्यासाठी असलेली गरज ओळखून “एलएचएसएस’ची रचना केली आहे.

डोकं, मान आणि मेंदू अशा अत्यंत संवेदनशील अवयवांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रगत तंत्राबरोबरच तज्ज्ञ शल्यचिकित्सकांची आवश्‍यकता असते. लॅप्रोस्कोपिक सर्जरी, आर्थोस्कोपिक सर्जरी हेच या “लोकमान्य एचएसएस’चे ठळक वैशिष्ट्य आहे, याचा अनुभव पुणेकरांना आता येत आहे.

त्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या नऊ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आहेत. अतिदक्षता विभागातील (आयसीयू) 20 बेडस्‌ आहेत. या सगळ्या उपकरणांच्या मदतीने, यंत्रणांमधून रुग्णाला निश्‍चित चांगले उपचार मिळतील. त्याच बरोबर रुग्णाला खडखडीत बरे वाटण्यासाठी एक आपलेपणाचे वातावरणही आवश्‍यक असते.

ही मानवी संवेदना ओळखुन आपुलकीने सेवा देणारा कर्मचारी वर्ग या लोकमान्य एचएसएसमध्ये आहे. म्हणूनचे कोरोनाच्या काळातही आणि त्यानंतर लोकमान्य ग्रुप ऑफ हाॅस्पिटल्स येथे जवळपास 500 शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणारी सर्व काळजी घेऊन डॉक्‍टरांनी या शस्त्रक्रिया केल्या.

लोकमान्य एचएसएसची पुणेकरांच्या आरोग्यप्रती असलेली निष्ठा हेच यातून अधोरेखित होते. वैद्यकशास्त्रातील प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता संगणक, रोबो याद्वारे आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर कुशलपद्धतीने सुरू झालेला आहे. जगातील असे अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजू व सामान्य लोकांना लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या द्वारे पुण्यात उपलब्ध करण्यात येत आहे, असे डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.