Pune News : देशव्यापी संपात एकत्र येत केंद्राच्या दमणकारी धोरणाविरुद्ध लढण्याचा कष्टकऱ्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने शेती विषयक कायद्यांमध्ये जाचक बदल करत मोडीत काढलेले 44 कामगार कायदे, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे नवे धोरण, भारतीय समाजात दुही निर्माण करणार्‍या नागरिकत्व नोंदणी खतावणी यासारखे दमनकारी निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. याविरुद्ध विविध संघटनांनी आज एकत्र येत संप यशस्वी केला.

देशभर आज (26 नोव्हेंबर) भारत बंदची हाक दिली होती. भारत बंद नागरिक समितीच्या माध्यमातून पुण्यातील अनेक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ससून इस्पितळा जवळील पुतळ्याला पुष्पहार घातला.

शेतमजूर,दगडखाण कामगार,बांधकाम मजूर, कागद काच पत्रा वेचक, बुरूड, कुंभार, अंगणवाडी ताई, डबा बारदान फेरीवाले, लोककलाकार, रिक्षा व टेम्पो चालक, हमाल असे अंगमेहनती काम करणारे कामगार यात सहभागी होते. त्यांनी आपआपल्या अवजारांच्या चित्र प्रतिकृतींचे मानवी चित्र रथ तयार करून आणले होते.

यात श्रमिकाच्या तळहातावर तरलेली पृथ्वी हा मानवी चित्ररथ, विविध राज्यातील कष्टकर्‍यांचे देशाच्या नकाशात कोलाज केलेला देशाचे भाग्यविधाते हा मानवी चित्ररथ, तसेच वरील घटकांच्या खुरपे, पाटी, बांबूची टोपली, रिक्षा ,घण-हातोडा, थापी-घमेले इ. च्या भव्य आकाराच्या प्रतिकृती, डबे बरदानची गुढी यांचा समावेश होता.

यासह ‘ अलूते-बलुते, कारु-नारू, कारागीर कष्टकरी सामाजिक सुरक्षेचे अधिकारी ’ या घोषणा फलका मागे आपआपल्या अवजारांच्या मानवी चित्र रथांसह वरील घटक जिल्हाधिकारी कचेरीवर रॅलीने गेले.

तेथे झालेल्या सभेत बोलताना डॉ. बाबा आढाव म्हणाले, वीज बिल माफीची विरोधकांची आंदोलने, मंदिर उघडण्यासाठीचा आग्रह या मागचेही राजकारण उकलून सांगण्याची गरज आहे. अदानी सारख्या खाजगी उद्योजकाच्या ताब्यात इथला वीज ग्राहक देण्यासाठी तर हे कारस्थान नाहीना या बद्दल बोलले पाहिजे. आत्ताच्या केंद्रीय राज्यकर्त्यां विरुद्धची ही लढाई बंद पुरती सीमित ठेवून चालणार नाही.

सभेत प्रा.अजित अभ्यंकर, रघुनाथ कुचीक, नीरज जैन यांचीही भाषणे झाली. समितीचे निमंत्रक नितिन पवार यांनी प्रस्तावना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.