Pune News : युवा सेनेच्या दणक्याने परीक्षा विभागाला आली जाग ; सव्वा तास उशिरा मिळाली प्रश्नपत्रिका

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बीएस्सी तृतीय वर्षाचा आज रसायनशास्त्राचा पेपर होता. मात्र, परीक्षा सुरु होऊन सव्वा तास झाला तरी प्रश्नपत्रिका ऑनलाईन अपलोड झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची घालमेल वाढली. दरम्यान, याबाबत युवा सेना विद्यापीठ कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे यांनी थेट परीक्षा संचालकांना जाब विचारल्यानंतर प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आली. यानिमित्ताने विद्यापीठ परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

याबाबत अधिक माहिती देताना विशाल हुलावळे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बीएस्सी तृतीय वर्षाचा आज रसायनशास्त्राचा पेपर होता. दुपारी बारा ते दोन ही या परीक्षेची वेळ होती. दुपारी बारा वाजता सर्व विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज होते. मात्र, रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड होईना. तब्बल सव्वा तास विद्यार्थी प्रश्नपत्रिकेची वाट पाहत होते.

दरम्यान, असंख्य विद्यार्थ्यांनी यासंदर्भात युवा सेना कक्ष उपाध्यक्ष विशाल हुलावळे यांना संपर्क साधून परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराची तक्रार केली. त्यावर हुलावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता परीक्षा विभागाचे संचालक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला. तसेच परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही क्षणात रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड झाली. मात्र, जवळपास सव्वा तास उशिरा प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची विद्यापीठाने दक्षता घ्यावी; अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा सेना विद्यापीठ कक्षाचे उपाध्यक्ष हुलावळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.