Pune News : ‘स्वच्छ’चे भवितव्य एक महिन्यानंतर ठरणार !

एमपीसी न्यूज : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठीचे काम करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या स्वच्छ संस्थेला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज एकमताने घेतला.

एक महिन्याच्या मुदतवाढीनंतर कचरा संकलन काम करणाऱ्या अन्य संस्थांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील कचरा संकलनाचे काम स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. पालिका व स्वच्छ सहकारी संस्था यांच्यामध्ये पाच वर्षे मुदतीचा करार करण्यात आला होता. हा करार त्यानंतर वाढविण्यात आला. हा करार 31 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आला असून सन 2020-21 पासून पुढील 5 वर्षासाठी करारनामा करण्याचा प्रस्ताव स्वच्छ संस्थेकडून प्राप्त झाला आहे.

कोरोनाचे संकट, आचारसंहिता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य सभेची मान्यता घेऊन पुढील 5 वर्षासाठी स्वच्छ संस्थेसोबत करार करण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यासाठी तात्पुरती करारवाढ करण्यास मान्यता मिळावी असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीकडून स्वच्छ संस्थेसोबतच करार पाच वर्षाकारिता का वाढविण्यात येत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि जवळच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी स्वच्छकडून हे काम काढून घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

तब्बल साडेतीन हजार कष्टकरी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. हे काम जर हिरावून घेतले तर हजारो कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपातील अनेक नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेला पाठींबा दर्शविला आहे. दरम्यान, प्रशासनाचे यावरील नेमके म्हणणे मागवून घेणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

स्वच्छ संस्थेकडून निवासी आणि व्यापारी आस्थापनांकडून आकारले जाणारे दर जास्त आहेत. निविदा प्रक्रिया राबविल्यास अशा प्रकारे काम करणाऱ्या अन्य संस्था पुढे येतील. त्यातून दरांबाबत स्पर्धा होईल आणि कमी दरात पुणेकरांना सेवा मिळेल असा उद्देश असल्याचे रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.