Pune News : सर्वसामान्य जनतेने आता आरोग्य दूत व्हावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 'फर्स्ट रिस्पॅान्डर व रोड सेफ्टी' प्रशिक्षणास प्रारंभ

एमपीसी न्यूज – लोकमान्य हॅास्पिटलने सर्वसामान्य जनतेला ‘फर्स्ट रिस्पॅान्डर व रोड ट्रेनिंग प्रोगाम’ अंतर्गत प्रशिक्षित करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. आता सर्वसामान्य जनतेने आरोग्यदूत व्हावे, असे उद्गार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काढले.

लोकमान्य हॅास्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर व मुख्य आर्थोपेडीक सर्जन डॅा. नरेंद्र वैद्य यांनी एक लाख सर्वसामान्य जनतेला ‘फर्स्ट रिस्पॅान्डर व रोड ट्रेनिंग प्रोगाम’चे शास्त्रशुद्ध मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

लोकमान्य हॅास्पिटल फॅार स्पेशल सर्जरी, जंजिरा वेल्फेअर फौंडेशन, जेरीवेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. पुण्यातील लोकमान्य हॅास्पिटल फॅार स्पेशल सर्जरी या ठिकाणी मंगळवारी (दि.22) पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, पुणे मनपा उपायुक्त डॅा. महेशकुमार डोईफोडे, डॅा. सुकुमार सरदेशमुख, अनिल पंतोजी, रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना प्रशिक्षण देण्याचा लोकमान्य हॅास्पिटलचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे सर्व सामान्य लोक आरोग्यदूत होतील.

लोकांचा जीव वाचविण्यासाठी सकारात्मक चळवळ उभी राहत आहे. या प्रशिक्षण शिबीरात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान शिरोळे यांनी केले.

यावेळी बोलताना प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॅा. नरेंद्र वैद्द म्हणाले, लोकमान्य हॅास्पिटलच्या माध्यमातून वीस वर्षापुर्वी ही संकल्पना अस्तित्वात आली. आजपर्यंत दीड लाख लोकांवर अपघातग्रस्तावर उपचार केले. पन्नास हजारांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचविले. पण तरीही हे काम पुर्ण झालेले नाही.

आजही वृत्तपत्र वाचनाची सुरुवात अपघातात मृत्यू झाल्याच्या बातम्यानेच होते. वेळेअभावी उपचार न झाल्याने ह्रदयविकार, पक्षाघात, फीट येणे यासारख्या विकाराने लोक प्राणास मुकतात अथवा विकलांग होतात. हे टाळता येणे शक्य आहे.

यासाठीच पुन्हा अधिक जोमाने “गोल्डन अवर” ही संकल्पना राबवून एक लाख पुणेकरांना ‘फर्स्ट रिस्पॅान्डर व रोड सेफ्टी’ प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे वैद्द यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे म्हणाले, वाहन चालकांनी सिट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे, हॅार्न न वाजवणे यासारखे सुरक्षेचे उपाय अंगीकारणे महत्वाचे आहे.

रस्ता सुरक्षा ही काळाची गरज असून पुण्यात रिक्षा हे महत्वाचे पण दुर्लक्षीत वाहन आहे. रिक्षा ॲम्ब्युलन्सला परवानगी मिळाली तर यात महत्वाची भूमिका निभावता येईल, असे बाबा कांबळे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक डॅा. श्रीकृष्ण जोशी केले. कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.