Pune News : कोविडमुळे अनाथ झालेल्या 700 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली

एमपीसीन्यूज : कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. दरम्यान, कोविडमुळे अनाथ झालेल्या 700 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे.

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील 1200 भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील 1100 आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे  700 विद्यार्थी असे मागील 30  वर्षात एकूण 3000 विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर  काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.

अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने व पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने, संशोधनावर आधारित उपचार करून त्याचे रिपोर्ट्स बनविण्यात आले आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई किंवा वडील अथवा आई व वडील असे दोन्हींचे छत्र हरपलेल्या व 5 वी ते 12 वी पर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेतील. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील.

बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नास्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.

भारतीय जैन संघटना मागील  30  वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रामध्ये अविरत कार्य करीत आहे. कोविडमध्ये सुद्धा मार्च 2020 पासून मोबाईल डिस्पेन्सरी सेवा, मिशन झिरो, प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, सेरो सर्व्हेलंस, कोविड केअर सेंटर्स, मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बँक व मिशन राहत या उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढा देत आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने 1993 सालापासून आजपर्यंत या संकुलात वेगवेगळ्या आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सहकार्य केले आहे. यावेळीही राज्य शासनाचे सहकार्य लाभत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.