Pune News : पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न येत्या आठवड्यात सोडवू – अजित पवार

एमपीसी न्यूज – पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील प्रश्न येत्या आठवडाभरात सोडवू, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिला.

पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्यासह पालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, पालिका अभियंता संघाचे सचिव सुनील कदम, पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडिक, गोपाळ चव्हाण, मधुकर नरसिंगे, चंद्रकांत गंबरे आदी उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आली आहे. या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात यावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी अजित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्दही त्यांनी दिला. याबद्दल सर्व कामगार संघटना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.

पालिकेच्या माध्यमातून पुणेकरांची काळजी घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटल्यानंतर इतर सर्व प्रश्नही लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.