Pune News : सेवेचा वारसा असाच वृद्धिंगत व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेवेची दीर्घ परंपरा आहे.राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सहकार्याचे आणि सहयोगाचे हे बीज आपल्यात रोवलेले असून सेवेचा वारसा असाच वृद्धिंगत व्हावा असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीर शिवराय विचार पथारी संघटना आणि पुणे विचारपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पूरग्रस्तांसाठी अन्न-धान्य आणि जीवन आवश्यक वस्तूनी युक्त मदतीचे ट्रक आज पाठविण्यात आला, त्या पवार यांच्या हस्ते ट्रकला झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माऴवदकर, भाई कात्रे, विठ्ठल गायकवाड, शिवराज माळवदकर योगेश निंबाळकर, विजय गोरे, नितीन काळे, शिवराय विचार पथारी संघटनेचे संजय निपाणी, रमेश राऊत, जितेंद्र पायगुडे, सुनिल काळे, सुनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार यावेळी म्हणाले, निसर्गाच्या कोपामुळे आपले कोकणातील बांधव अडचणीत आले आहेत. त्यांना शासन सर्वतोपरी मदत करेलच पंरतू आपली सामाजिक बांधिलकी ओळखून माळवदकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोकणातील बांधवांकरीता केलेल्या या मदत कार्यामुळे समाधान वाटते.

राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माऴवदकर म्हणाले, पवार कुटुंबीयांची साध्या कार्यकर्त्यांच्या वाईट प्रसंगी धावून जाण्याची त्यांची परंपरा आहे. परवा पूरग्रस्त भागात अजितदादांना चिखलात चालताना बघून मला शरद पवार यांची आठवण झाली. 30 वर्षांपूर्वी जेव्हा भाजे गावाची दुर्घटना घडली होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणुन शरद पवार, तत्कालीन पालकमंत्री म्हणुन मदन बाफना आणि जिल्हाधिकारी म्हणुन श्रीनिवास पाटील चिखलातून सावरत पाहणी करतांना आम्ही दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांतून पाहिले होते. पुढे ह्या प्रसंगाचे पुतळे करून आमच्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीर येथील सार्वजनिक गणेश उत्सवात देखावा दाखवला होता.

विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. शिवानी माळवदकर यांनी कोकणातील पुरग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीची थोडक्यात माहिती दिली. शिवराज माळवदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.