Pune news: जिल्ह्यातील माथाडी कामगार आर्थिक मदतीपासून वंचित; माथाडींच्या मदतीसाठी इरफान सय्यद यांचे कामगारमंत्र्यांना साकडे

माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून पाच हजार रूपांपर्यंत रक्कम नोंदणीकृत माथाडी कामगारांना देण्याबाबत सरकारने सूचना दिल्या आहेत.

एमपीसी न्यूज – माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून पाच हजार रूपांपर्यंत रक्कम नोंदणीकृत माथाडी कामगारांना देण्याबाबत सरकारने सूचना दिल्या आहेत. याचा लाभ पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी कामगार मंडळ वगळता राज्यातील सर्व माथाडी कामगार मंडळांना मिळालेला आहे. त्यांनी सदर आर्थिक मदत माथाडी कामगारांपर्यंत पोहोचवलेली देखील आहे. मात्र, आजपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील माथाडी कामगार या आर्थिक लाभापासून वंचित आहेत. या कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष/सचिव यांना याबाबत पत्र पाठविले आहे.

यात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या 1 लाखांहून अधिक असून, सद्य:स्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या, शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प आदी ठिकाणी 28 हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत.

या पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती आणि सततच्या लॉकडाऊनमुळे माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती पाहता आपण बांधकाम व इतर कामगारांना ज्याप्रमाणे आर्थिक मदत केली.

त्याच धर्तीवर 22 जुलै 2020 च्या पत्रान्वये माथाडी कामगारांना देखील माथाडी मंडळाच्या प्रशासकीय / राखीव निधीमधुन आर्थिक मदत म्हणुन पाच हजार देण्याची भुमिका घेतली व तसे आदेश माथाडी मंडळांना दिले. त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आपले मनापासून आभार.

उद्योग – उर्जा – कामगार विभागाने निर्गमीत केलेल्या आदेशाचे पालन करीत मुंबई व राज्यातील ग्रामीण जिल्हयातील माथाडी मंडळांनी निर्णय घेत, सदर आर्थिक मदत माथाडी कामगारांपर्यंत पोहोच केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड व पुणे माथाडी मंडळाकडुन अद्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित माथाडी कामगार अद्यापही या लाभापासून वंचित आहे.

लॉकडाऊनमध्ये पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी शासनाच्या कार्याला मोठा हातभार लावला आहे.

शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन, लवकरात लवकर निर्णय घ्यावा व पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगारांना आर्थिक मदत करावी, असे या पत्रात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.