Pune News : उद्घाटनाच्या कार्यक्रमातच महापालिकेची इमारत गळत होती; रुपाली चाकणकरांचा महापौरांना टोला

एमपीसीन्यूज : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलेच राजकारण पाहायला मिळते आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे. चाकणकर यांनी ट्विट करत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, पुणे महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहे. पुणे “स्मार्ट सिटी” योजनेसाठी केंद्र सरकारने निवडलेले शहर आहे याची माहिती कदाचीत महापौरांना नसावी. पुण्याचे कर्तव्यदक्ष खासदार भाजपाचे आहेत, शहरातील बहुतांश आमदार भाजपाचे आहेत आणि स्वतः महापौर ही भाजपाचेच आहेत.

तरीही कालच्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे असे त्यांना वाटते. मुरलीधर मोहोळ यांच्या माहितीसाठी एका गोष्टीची आठवण करुन द्यावी लागेल.   महानगरपालिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच इमारत गळत होती. त्यावरून लक्षात घ्यायला हवे की पुण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्यानंतर काय होणार आहे.

एका पावसाने पुण्याला नदीचे स्वरुप येत असेल तर “स्मार्ट सिटी” योजनेत नक्की काय केले गेले हे एकदा तपासून घ्यायलाच हवे, असा टोला चाकणकर यांनी महापौर मोहोळ यांना लगावला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी कात्रज परिसरात केलेल्या पाहणी दौऱ्यात कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याचे सांगत भाजप महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपवर तोफ डागली होती.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही इतकी वर्ष तुमचीच सत्ता होती तरीही विकास कामे प्रलंबित आहेत असे प्रत्युत्तर दिले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.