Pune News : नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी साधला पोलिसांमधील कोविड योद्ध्यांशी मनमोकळा संवाद

एमपीसी न्यूज – पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कामकाजाची माहिती करुन घेत असतानाच पुणे पोलीस सेवेतील कोरोनाग्रस्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आज (बुधवारी) सायंकाळी झूम मिटींगद्वारे मनमोकळा संवाद साधला. यावेळी पोलीस उपआयुक्त मितेश घट्टे हे देखील उपस्थित होते.

अमिताभ गुप्ता यांनी 150 सक्रीय रुग्णांपैकी 130 कोरोना योद्ध्यांशी संपर्क साधला. त्यांनी हॉस्पिटल किंवा होम क्वॉरंटाईन असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधण्याला प्रथम प्राधान्य दिले.

त्यावेळी कोणाच्या कुटुंबामध्ये सर्वजण बाधित तर कोणी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन नुकतेच घरी परतलेले, अशा सर्वांशी बोलताना कोरोना कधी झाला ? उपचार व्यवस्थित चालू आहेत का? लवकर बरे व्हा अशी आपुलकीने विचारपूसही केली.

अशा मैत्रीपूर्ण व आपुलकीच्या संवादामुळे आपल्याला समजून घेणारा आणि आपल्या सुख दुःखात सामिल होणारा कुटुंब प्रमुख आपल्याला लाभला आहे, अशी विश्वासाची भावना निर्माण झाल्याने अनेकांना गहिवरुन देखील आले.

बरे झालेल्यापोलिसांच्या चेह-यावरील आनंदाच्या छटा पाहून, कोरोनाबाधित कुटुंबातील आईला जास्त त्रास देऊ नका अशी मिश्किल टिपणीसुद्धा गुप्ता यांनी केली. त्यामुळे नवीन आयुक्तांच्या वेगळ्या स्वभावछटेची ओळख झाली.

पोलीस कोविड योद्ध्यांशी संवाद साधताना नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी आपल्या बहिणीचे उदाहरण देताना सांगितले की, आपली बहिणही डॉक्टर असून कोरोनाग्रस्तांच्या सेवेमध्ये व्यस्त असताना ती स्वतःदेखील कोरोनाबाधित झाली.

त्यामुळे तिची दोन्ही मुलेही कोरोनाबाधित झाल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगत कुटुंबाच्या स्वास्थ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. घरच्यांची काळजी ध्या, मुलांची काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला त्यांनी यावेळी पोलसांना दिला.

गुप्ता यांच्या या उपक्रमामुळे पुणे शहर पोलीस दलामध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण होऊन त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चितच वाढ होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस दलात व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.