Pune News: फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवणार- महापौर मुरलीधर मोहोळ

दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे 90 टक्के विसर्जन घरच्या घरी झाले होते. हाच कल गृहीत धरुन फिरत्या हौदांचे नियोजन करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे लोकेशनही क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुणेकरांना समजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर मोहोळ यांनी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, मनसे गटनेते वसंत मोरे, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे 90 टक्के विसर्जन घरच्या घरी झाले होते. हाच कल गृहीत धरुन फिरत्या हौदांचे नियोजन करण्यात येत आहे. महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत पुणेकरांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून आपल्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती दिली आहे.

दीड दिवसांच्या जवळपास 90 टक्के मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी घरातच केले. याबद्दल पुणेकरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. याच अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात येत आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे’.

गेल्या वर्षी दीड दिवसांच्या 13 हजार 585, पाचव्या दिवशी 25 हजार 896, सातव्या दिवशी 29 हजार 997 आणि शेवटच्या दिवशी 3 लाख 55 हजार 154 गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले होते.

यावेळी रासने यांनी शेवटच्या दिवशींच्या मूर्तींची संख्या लक्षात घेता नियोजन करावे, बागूल यांनी धार्मिक भावना लक्षात घेऊन नियोजन करावे तर मोरे यांनी विसर्जनाच्या नियोजनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उद्घोषणा आणि जाहिरात करण्याची सूचना केली.

पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवसाच्या विसर्जनाचे नियोजनही बैठकीत करण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.