Pune News : ‘या’ एका शब्दावरून पुणे विद्यापीठ वादात, चूक लक्षात आल्यानंतर केली दिलगिरी व्यक्त

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षा सुरू असतानाच यापूर्वी अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. परंतु “जिदाही दहशतवाद’ या शब्दावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गोत्यात आले आहे.  हा शब्द वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने यावर तातडीने खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

विद्यापीठातर्फे “डिफेन्स बजेटींग’ या विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यात धार्मिक, क्रांतिकारी, राजकीय आणि राज्य पुरस्कृत असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा प्रश्‍न सोशल मिडीयावरून व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या कामावर टीकेची झोड उठली.

 

दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी स्तरावर झालेल्या एका परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या गेल्या बाबत तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत. यासंबंधात संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला असून विद्यापीठ योग्य ती कार्यवाही निश्चितपणे करेल. परंतु या संपूर्ण प्रकाराबद्दल विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करत आहे. याच अनुषंगाने अशा प्रकारचे काही बनावट प्रश्न तयार करून समाज माध्यमांमध्ये व्हायरल करून विद्यापीठाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आलेली आहे. यासंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर कारवाईला विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.