Pune News : औरंगाबादचे नामांतर हा राजकीय नव्हे भावनिक मुद्दा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही. तसेच निवडणुकीचा देखील नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का ? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला ? ते पहिले हटवा, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोथरूड येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, दैनिक सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. याबाबतीत आता संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर ती भाषा वापरली आहे.

मी आता ‘सामना’च्या संपादिका रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. ही तुमची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ही भाषा कशी, अशी विचारणा करणार आहे.

तसेच औरंगाबादचे संभाजीनगर करा, ही सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली होती. तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर. काँग्रेसचा विरोध आहे, अन् शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे यात आम्हाला पडायचं नाही.

मुंबई पालिका जिंकणे हे भाजपचे लक्ष

आगामी 2022 साली मुंबईसह इतर पालिका निवडणुका लढवणे जिंकणे हे आमचं लक्ष्य आहे. नवीन वर्षात आमचा हाच संकल्प राहील. तसेच त्यातही मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील आणि मुंबई ही काही जणांची जहागिरी राहिली आहे.

मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. फक्त निधी निर्माण करणे एवढंच लक्ष राहीले आहे. त्यामुळे मुंबई पालिका जिंकणे हे तर लक्ष्य आहेच आणि 2024 मध्ये राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचे ध्येय्य असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.