Pune News: आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची – विभागीय आयुक्त

येरवडा येथील ॲण्टीजन चाचणी सेंटरची पाहणी; लॉकडाऊन कालावधीतील कार्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – कोणत्याही आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत कोरोना चाचण्यामध्ये पुणे देशात आघाडीवर आहे. कोरोना चाचण्या वाढविल्यामुळे कोरोनाचे निदान वेळेत होवून रुग्णाला वेळेत उपचार मिळतात. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही पुणे जिल्हयात समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये भारतीय जैन संघटना व पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ॲण्टीजन चाचणी केंद्राची पाहणी तसेच लॉकडाऊन कालावधी दरम्यान केलेल्या कार्याच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अविनाश साळवे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, साहिल देव आदी उपस्थित होते.

देशात, राज्यात ज्यावेळी नैसर्गिक संकट येते, त्यावेळी सामाजिक संस्थांच्या मदतीची आवश्यकता असते. भारतीय जैन संघटनेसारख्या अनेक सामाजिक संस्था कोरोना संसर्गाच्या कामातही कार्यरत आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यामुळे अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी गतीने होण्यास मदत झाली असून यामध्ये वेळेत कोरोनाचे निदान झाले.

निदान झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ झाले आहे. कोरोनाचे वेळीच निदान झाल्याने मृत्यूदर कमी करण्यासही मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, पुणे महापालिका क्षेत्रात देशात सर्वाधिक कोरोना निदानाच्या चाचण्या होत आहेत. सलग 52 दिवसापासून पुणे कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांमध्ये आघाडीवर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानकारक बाब आहे.

कोरोनातून बरे झालेल्या व प्लाझ्मादान पात्रतेचे निकष पूर्ण करत असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, याकामी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांनी मदतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत.

निदान व उपचार वेळेत होतील याकडे विशेष लक्ष असून लवकरच पुणे कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा तसेच नगरसेवक अविनाश साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे शहरात मिशन झिरो कार्यक्रमांतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती तसेच कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्यांच्या आणि वयोवृध्द व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.