Pune News : शहरातील झोपडपट्टी वासियांना मिळणार वाल्मिकी आंबेडकर घरकुल योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरातील झोपडपट्टी वासियांना वाल्मिकी आंबेडकर योजने अंतर्गत 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि पुणे महापालिका प्रशासनाची समन्वय आढावा बैठक संपन्न झाली. या बैैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  रूबल अग्रवाल, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

शहर आणि उपनगरांमध्ये घोषित व अघोषित 400 हून जास्त झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी वाल्मिकी आंबेडकर घरकूल योजना राबविण्यात येते. यामध्ये विशेषत: अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना पहिले प्राधान्य दिले जाते. परंतु या योजनेची व्याप्ती वाढवून सर्वांना योजने अंतर्गत 50 हजार रुपये देण्याची तरतूद आहे.

ही योजना ग्रामीण भागात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. परंतु शहर, उपनगरांमध्ये झोपडपट्टी वासियांना लाभ मिळत नव्हता. एसआरए आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने वाल्मिक आंबेडकर योजनेची लाभ नेमका कोणाकोणाला देता येईल, त्याची संभाव्य संख्या आणि झोपडपट्ट्यांची यादी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

येत्या काही महिन्यांमध्ये वाल्मिकी आंबेडकर योजनेचा लाभ देण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.