Pune News : जम्बो कोविड सेंटरमधून गायब झालेली महिला सुखरूप सापडली

एमपीसी न्यूज – पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटरमधून गायब झालेली 33 वर्षीय प्रिया गायकवाड ही महिला भुगाव ( ता. मुळशी) येथे सुरक्षित आढळून आली. तिला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांसह आंदोलकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेला जबाबदार असणाऱ्या कोविड सेंटरमधील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता प्रिया गायकवाड ही महिला नुकतीच बेपत्ता झाली होती. तिचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत तिच्या आईवडिलांनी जम्बो कोविड सेंटर बाहेर आमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनात सहभाग घेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अमोल डंबाळे, सुजित यादव, अजय लोंढे, अनिता साळवे, संतोष डंबाळे,स्नेहल कांबळे यांनीही पाठिंबा दिला होता.

29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ससून हॉस्पिटल मार्फत शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या महिलेविषयी उलटसुलट माहिती देऊन खरी माहिती दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चा आणि संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला होता.

दरम्यान, कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या महिलेचा आज भूगाव येथे शोध लागला.

बेपत्ता झालेली महिला सुखरूप सापडली याचा आनंद आहे. या ही घटना घडल्याने जम्बो कोविड सेंटरचा ढिसाळ कारभार उजेडात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेच्या कुटुंबियांना योग्य माहिती दिली नाही. उलट सुरुवातीपासून दिशाभूल करणारी माहिती दिल्याने आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागला. आता बेपत्ता महिला सुखरुप सापडली आहे. मात्र, या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. राहूल डंबाळे – संस्थापक, अध्यक्ष – रिपब्लिकन युवा मोर्चा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.