Pune News :…तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू ; संभाजी दहातोंडे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला. आज (सोमवार, दि. 15) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संभाजी दहातोंडे म्हणाले, कोरोनाचे संकट असताना देखील राज्यात विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होताहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दहातोंडे पुढे म्हणाले, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यंदा शिवजयंती साजरी करण्यात राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या शिवजयंतीवर अनेक निर्बंध आले असून, शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. केवळ 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देत इतर कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

शिवजयंती साजरी करण्याबाबत सरकारने घातलेल्या अटी ताबडतोब रद्द करून उत्साहात शिवजयंती साजरी करू द्यावी. या अटी रद्द न केल्यास राज्यभरातील तमाम शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील, असा इशारा दहातोंडे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.