Pune News : …तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल : छगन भुजबळ

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल, तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल, असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

महात्मा फुले यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त, ‘समता भूमी, महात्मा फुले स्मारक’ इथं झालेल्या या कार्यक्रमात यावेळी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले, लोकशाहीत किती डोकी विचारांच्या, मागणीच्या पाठीमागे आहेत हे पाहिलं जातं. ओबीसी समाज 54 टक्के आहे, त्यामुळं त्यांचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आधी आघाडी सरकारने आणि नंतर फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला आम्ही पाठिंबाच दिला आहे. पाठिंबा असताना हा विषय वेगळ्या दिशेने जाऊ नये यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे.

धर्माधर्मात आणि जातीजातीतली भांडणं वाढत आहेत. ती मिटवण्यासाठी समता सैनिकांनी कायम पुढं राहिलं पाहिजे, असे सांगून ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बार्टी’, ‘सारथी’ च्या धर्तीवर ‘महाज्योती’ नावाची संस्था सुरू करावी. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू करावं, सावित्रीबाई फुले घरकुल योजना सुरू करावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, अशा विविध मागण्या समाजाच्या असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

डॉ.लहाने म्हणाले,  ‘कोव्हिड-19 वर अजून लस यायची आहे. पण सध्यातरी मास्क हेच आपले व्हॅकसीन आहे. दुसरी लाट येणार अशी चर्चा आहे, मात्र ती कधी येईल हे कुणी सांगू शकत नाही. पण धोका न टळल्याने आपण जागरूक राहिलं पाहिजे. ‘मला हा आजार होणार नाही’ या मानसिकतेतून आपण बाहेर आलं पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजवरचे कोव्हिड संदर्भातले निर्णय वैज्ञानिक आहेत. त्यामुळेच लोकसंख्या जास्त असूनही आपल्याकडे मर्यादित प्रसार झाला. दरवेळी नवनवी मार्गदर्शक तत्त्व करून ती पोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीने सरकारने केलं आहे.’

‘महात्मा फुले यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार माझ्या घरचा पुरस्कार आहे. मला किडनी देऊन पुनर्जन्म देणारी आई आणि माझे रुग्ण यांच्यामुळंच मला हा सन्मान मिळाला आहे. काळ कोणताही असो आपल्याला चांगलं काम करता येतं, हेच महात्मा फुले यांच्याकडून शिकता येतं, असंही लहाने यांनी सांगितल.

कार्यक्रमात सद्दाम मणेरी (सामाजिक), डॉ. कैलास करांडे (शैक्षणिक), संतोष रणदिवे (पत्रकारिता), बाळासाहेब पाटील (कला), भैरवनाथ बुरांडे (कृषी), चंद्रकांत भुजबळ (साहित्य) यांना समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘एक दिवा ज्ञानाचा आणि एक दिवा संविधानाचा’ या निबंध स्पर्धेतील विजेते धनंजय झोंबाडे, हेमाला म्हात्रे, दया पाटील, रतिलाल बावेल, दीपाली नेहर, निकिता धनी यांना पारितोषिके देण्यात आली.

कै. दत्तात्रय देवराम ससाणे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक योगेश ससाणे यांच्यावतीने दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बापूसाहेब भुजबळ आणि प्रितेश गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन डॉ. नागेश गवळी यांनी केले. आभार पंढरीनाथ बनकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.