Pune News : कोरोनासंदर्भात महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच

महापौर, सभागृह नेत्यांचे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्या पुढे गेली आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडस मिळत नाही, यावर तरी महापालिका प्रशासनाला खुलासा करू द्या, अशी मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतर्फे शुक्रवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून तातडीने सभा तहकूब केली.

पुणे महापालिका सर्वसाधारण सभेत आज कोरोना संदर्भातील विविध प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

पुणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे खाजगीकरण होऊ नये, हे चुकीचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अधिक सक्षम हवे. प्रशासनाने याबाबतीत खुलासा करावा, अशी मागणी माजी महापौर प्रशांत जागताप यांनी केली.

कोरोना रुग्णनांना डॅश बोर्डवर बेडस उपलब्ध नाही. नायडू, जम्बो, ससूनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते आधी सांगा, शिक्षण मंडळाचे अधिकारी बोलावले, स्मार्ट सिटी अधिकारी का बोलावले नाही, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचे सभासद पोटतिडकीने बोलत असताना त्यांची दाखल घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली.

कोरोनामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात आहे, त्यांना ऑक्सिजन बेडस मिळत नाही, याची उत्तरे द्या, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली.  महापालिका प्रशासनाला पाठीशी घालू नका, उत्तरे द्या, महापौर खुलासा करायला सांगा, असेही त्यांनी सांगितले.

आता अँटी चेंबरमध्ये चर्चा भरपूर झाली. सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना खुलासा करायला सांगा, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना नगरसेवकांच्या भावना तीव्र आहेत, त्यांना बोलू द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली. शेवटी महापौर बोलू देत नसल्याने नगरसेवक गणेश ढोरे, गफूरभाई पठाण, बाबुराव चांदेरे यांनीही महापौरांसमोर येऊन जाब विचारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.