Pune News :..म्हणून पेट्रोल डिझेल दरवाढ गरजेची : चंद्रकांत पाटील यांचा धक्कादायक युक्तीवाद

एमपीसी न्यूज : केंद्राच्या अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी पैसा कोठून आणायचा ? म्हणून सेस लावून पेट्रोल डिझेल दरवाढ गरजेची असा धक्कादायक युक्तीवाद भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुणे महापालिकेत विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आ.सुनिल कांबळे, आ.मुक्ता टिळक, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकरी पीककर्जासाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे. यामुळे सावकारी कर्जापासून त्यांची मुक्तता करून संस्थात्मक कर्ज वाढेल. तसेच स्वामीनाथन आयोगाची 50 टक्के हमीभावाची शिफारस आम्ही पूर्ण करू शकणार आहे. आरोग्यासह पायाभूत सुविधांसाठी 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. लघु उद्योगाची मर्यादा 2 कोटींवर आणल्यामुळे कोट्यवधी उद्योजकांना लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी, उद्योजकांसह मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या दरम्यान नव्याने सेस लावल्यामुळे पुन्हा पेट्रोल डिझेल दरवाढीची शक्यता आहे त्यावरील प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी दरवाढ करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी पैसा आणायचा कोठून असा प्रतिप्रश्न उपस्थित करत दरवाढीचे अप्रत्यक्ष समर्थन केले. तसेच इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.