Pune News : यंदाचा पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव रद्द, धार्मिक विधी साध्या पद्धतीने

एमपीसी न्यूज – कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी संगम असणाऱ्या 26 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची आज बैठक झाली. कोविड-19 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत यंदाचा पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

गेल्याच वर्षी दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नवरात्रीच्या दहा दिवसांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नसून शिवदर्शन येथील महालक्ष्मी मंदिर येथे देवीची आरास, देवीची पूजा व आरती हे कार्यक्रम चालू राहतील.

मंदिर परिसरात मंडप उभारण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून भाविकांच्या सोयीकरिता कोरोनाचे सर्व नियम पाळून श्री महालक्ष्मी देवीचे ऑनलाईन दर्शन देखील आयोजित केले जाईल. याची भक्तांनी नोंद घ्यावी.

पुणे नवरात्रौ महोत्सव रद्द झाला असेल तरी सर्वत्र कोरोनाचे संकट आलेले आहे. ते त्वरित दूर व्हावे. सुखा-समाधानाने भक्‍तांना जगता यावे व कोरोना दृष्ट राक्षसाचा नाश करावा. अशी प्रार्थना श्रीमहालक्ष्मी देवीला सर्वांनी करूया. तसेच पुढील वर्षी आणखी दिमाखात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.

या बैठकीस पुणे नवरात्रौ महोत्सवाचे ट्रस्टी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागूल, सागर बागूल, सागर आरोळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.