Pune News : एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्यांचा महावितरण मधील नोकरीच्या निवड यादीत समावेश नाही

मराठा क्रांती मोर्चाचे महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – महावितरणकडून घेण्यात आलेल्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या परीक्षेत मराठा समाजातील उमेदवारांनी एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केले. एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांचा महावितरणकडून निवड यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने बुधवारी (दि. 2) सकाळी अकरा वाजता रास्ता पेठ, पुणे येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

सतीश काळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण डावलून इतरांसाठी आरक्षण प्रक्रिया सुरु केल्या. यामुळे मराठा समाज नाराज आहे. दरम्यान महावितरणकडून जाहिरात क्रमांक 05 / 2019 नुसार उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात मराठा समाजातील उमेदवारांनी एसईबीसी आरक्षणांतर्गत अर्ज केले. उमेदवारांच्या निवड यादीची प्रत्यक्ष पडताळणी 1 आणि 2 डिसेंबर 2020 रोजी होत आहे.

महावितरणच्या या निवड यादीमध्ये मराठा समाजातील ज्या उमेदवारांनी एसईबीसी अंतर्गत अर्ज केले आहेत, त्या उमेदवारांना समाविष्ट करण्यात आलेले नाही. शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे ही भरती करू नये. या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुणे रास्ता पेठ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालय (पॉवरहाऊस) येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सतीश काळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.