Pune News: कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा; अदर पूनावाला यांची जो बायडेन यांना विनंती 

एमपीसी न्यूज – लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पूनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच विनंती केली आहे. 

अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.

ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘आदरणीय जो बायडेन, जर आपण खरंच करोना व्हायरस विरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे.’

अदर पूनावाला यांनी याआधीही कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता. मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं असं अदर पूनावाला यांनी म्हटलं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.