Pune News : टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान, सुबोध भावेच्या घरी खास गणपती सजावट
एमपीसी न्यूज – घरोघरी आज बाप्पांचे आगमन झाले आहे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना सरकारने केली आहे. मराठी अभिनेता सुबोध भावेने आपल्या घरी टोकियो ऑलिम्पिक 2021 पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचा सन्मान करणारी गणपतीसाठी सजावट केली आहे.
अभिनेता सुबोध भावेने आपल्या फेसबुक अकाऊंट वरुन घरी केलेल्या गणपती सजावटीचे फोटो शेअर केले आहेत. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना सुबोध भावेने ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंप्रती आदर व्यक्त करत बाप्पाच्या सभोवती त्यांचे फोटो उभारले आहेत. ‘पदक जिकणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आणि कौतुक’ असं कॅप्शन देत सुबोध भावेने गणपती सजावटीचा फोटो शेअर केला आहे.
सजावटीत नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहैन आणि पुरुष राष्ट्रीय हॉकी संघाचे फोटो लावण्यात आले आहेत.
नुकतेच टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवत सात पदकं मिळवली. भालाफेक मध्ये भारतीय सैन्य दलात असलेल्या नीरज चोप्राने गोल्ड पदक जिंकून वेगळा इतिहास रचला आहे.