Pune News : वाहतूक पोलिसांचा असाही निषेध; चूक नसताना उचललेल्या गाडीचे पुणेकराने ‘स्मारक’ उभारले

एमपीसी न्यूज – चूक नसतानाही वाहतूक पोलिसांनी दुचाकी उचलली. त्याचाच मनस्ताप झालेल्या एका युवकाने अनोख्या पद्धतीने पोलिसांचा निषेध केला. गणेशोत्सवाचे निमित्त साधून एका पुणेकराने देखाव्याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांचा निषेध केला. गणपतीसमोर उभारलेला या देखाव्यातून त्याने वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा बुरखा फाडला.

त्याचं झालं असं की, कोथरूडमध्ये राहणाऱ्या सचिन धनकुडे यांची दुचाकी 15 जून रोजी वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये उभी केली याचं कारण सांगून उचलून नेली होती. सचिन यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन आपली बाजू पोलिसांसमोर मांडली. परंतु तरीदेखील वाहतूक पोलिसांनी त्यांची दुचाकी देण्यास नकार दिला. त्याची गाडी नो पार्किंग मध्ये उभे असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. त्यामुळे सचिनने देखील दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून त्याची दुचाकी पोलिसांकडे होती.

दरम्यान कोणतीही चूक नसताना पोलिसांनी गाडी उचलून नेल्यामुळे मनस्ताप झालेल्या सचिन यांनी थेट गणेशोत्सवात यासंबंधीचा देखावा उभारला. वाहतूक पोलिसांचा निषेध करण्यासाठी त्यांनी चक्क दुचाकीचे स्मारक उभारले. या स्मारकात त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि सर्वात वरच्या भागात दुचाकी उभी केली.

या स्मारकाच्या बाहेर सचिन धनकुडे यांनी वेगवेगळे संदेश देणार्‍या पुणेरी पाट्या लिहिले आहेत. “भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहेत!”, “पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, मा ने कहा शराब छोड दो, बाबुजी ने कहा घर छोड दो, और पीछे बैठी पारू ने कहा है सिग्नल तोड दो” अशा प्रकारची वाक्ये लिहून त्यांनी कोणतीही चूक नसताना गाडी उचलणाऱ्या पोलिसांचा निषेध देखाव्याच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.