Pune News : पार्क केलेल्या दुचाकी व लोकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या दुचाकी व नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली आहे. चौकशी अंती त्यांनी तब्बल 8 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अजय यशवंत सावंत (वय 19, रा. खडकी बाजार) आणि राजेश बैजू नेटके (वय 19, रा. जुनी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरात पादचारी नागरिकांना अडवून त्यांच्या जवळील मोबाईल व किंमती ऐवज चोरणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. धमकावत चोरटे भरदिवसा देखील लूटमार करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना सराईतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान युनिट चारचे पथक लूटमार करणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. यावेळी कर्मचारी विशाल शिर्के व राकेश खुनवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, औंध भागात मुलीसोबत दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या हातातील मोबाइल हिसकवणारे गुन्हेगार खडकी परिसरात फिरत आहेत. तसेच त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत.

यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त मितेश घट्टे, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड,कर्मचारी सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर पाटील, गणेश साळुंखे, निलेश शिवतारे, दत्ता फुलसुंदर यांच्या पथकाने त्यांना पकडले.

त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. यानंतर त्याच्याकडे सखोल तपास केला असता शहरातील लुटमरीचे 4 आणि वाहन चोरीचे 4 असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.