Pune News : शहरात मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना, दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावण्याचे वाढते प्रमाण

एमपीसी न्यूज – दुचाकीचा वापर करून चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात गुरुवारी (दि.24) विश्रांतवाडी व कोंढवा बुद्रुक याठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना घडल्या.

मंगळसूत्र चोरीची पहिली घटना विश्रांतवाडी भाजी मार्केट आळंदी रोडवर सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत 21 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या आपल्या सासू यांच्या सोबत भाजी घेऊन घरी जात असताना, पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने सासूच्या गळ्यातील 60 हजार किंमतीचे मंगळसूत्र हिसकावुन चोरून नेले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मंगळसूत्र चोरीची दुसरी घटना कोंढवा बुद्रुक येथील तालाब मज्जिद समोर सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथील 38 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोंढवा बुद्रुक येथील तालाब मज्जिद समोरुन रस्ता ओलांडत असताना, पाठिमागुन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजार किंमतीचे मंगळसूत्र हिसकावुन चोरून नेले.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.