Pune news: पुण्यातील गॅंगवारमध्ये दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत  आज भर दुपारी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये संतोष जगताप ( वय 38) आणि स्वागत बापू खैरे (वय 24 ) या दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनई समोर चर्चा करीत असताना रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मयत

या हल्यानंतर संतोष जगताप याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी तो मयत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तसेच शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील या देखील घटनास्थळी गेल्या आहेत. टोळीयुध्दातून फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

संतोष जगतापने 2011 मध्ये दोघांचा खून केला होता.

राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन 2011 मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात न्यायालयात जामीनावर संतोष जगताप बाहेर होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.