Pune News : डेक्कन येथे उभारणार दुमजली वाहनतळ !

एमपीसी न्यूज : डेक्कन परिसरातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे होणारी कोंडी लवकरच फुटण्याची चिन्हे आहेत. कारण डेक्कन जिमखाना मॅक्डोनाल्ड शेजारील पार्किंगच्या रिकाम्या जागेत दुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे.

तळमजला अधिक दोन मजले असे हे वाहनतळ उभारले जाणार आहे. त्याचा सुधारित प्रस्ताव प्रकल्प विभागाने बांधकाम विभागासमोर सादर केला आहे. दरम्यान, या वाहनतळापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरच मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यामुळे हे वाहनतळ महत्त्वाचे आणि सोयीचे ठरणार आहे.

डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आस्थापना असल्याने जंगली महाराज रस्ता, तसेच लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवरच उभी असतात.

_MPC_DIR_MPU_II

तर अनेकदा नो-पार्किंगची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालक वाहनातच बसून राहतात. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी पालिकेने संभाजी उद्यानाजवळ बहुमजली मेकॅनिकल पार्किंग उभारले आहे.

मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव ते बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम आहे. येथील मॅक्डोनाल्डशेजारी महापालिकेचे वाहनतळ असले, तरी तेथील वाहनांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पालिकेने येथेच बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रकल्प विभागाने बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता.

सुरुवातीला हा प्रस्ताव तळमजला अधिक चार मजले असा होता. मात्र, जागेबाबत काही अडचणी असल्याने आता सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात तळमजला अधिक दोन मजले बांधकाम प्रस्तावित आहे. त्यामुळे या वाहनतळाचे काम तातडीने मार्गी लागल्यास या भागातील वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.