Pune News: कमला नेहरू रुग्णालयात दोन वर्षीय चिमुरडीचा अचानक मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात एमआरआयसाठी आणलेल्या एका दोन वर्षे वयाच्या चिमुरडीचा अचानक मृत्यू झाला. या मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला.

शिवन्या दिनेश सोनवणे (वय 2 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनवणे कुटुंबीय मूळचे उरण येथील रहिवाशी आहेत. सध्या ते पुण्यातील नाना पेठेत राहतात. गुरुवारी दुपारी शिवन्या हिला कमला नेहरू रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आणले होते.

रुग्णालयात आणल्यानंतर तिला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच शिवन्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सध्या फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी चौकशी करावी, अशी विनंती केली आहे.

त्यानंतर या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.