Pune News: कोरोनाविरुद्ध ढाल घेऊन वीजयोद्ध्यांची खडतर परिस्थितीतही अविश्रांत ग्राहकसेवा

एमपीसी न्यूज – गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूविरुद्ध आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची ढाल घेऊन महावितरणचे वीजयोद्धा पुणे परिमंडलातील सुमारे 31 लाख वीजग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत सेवा देत आहेत. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे अत्यंत खडतर परिस्थिती उद्भवली असताना त्यावर यशस्वी मात करीत सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सेवा देण्याची कामगिरी महावितरणचे वीजयोद्धे बजावत आहेत.

दरम्यान, पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत महावितरणच्या विविध कार्यालयातील कोरोना संसर्ग झालेल्या एकूण 249 पैकी 158 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर दुर्दैवाने 8 वीजयोद्धांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 83 जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संसर्गजन्य लक्षणांमुळे घरी क्वॉरंटाईन आहेत. मात्र कोरोनाशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी अन्य वीजयोद्ध्यांनी कर्तव्य बजावत महावितरणच्या ग्राहकसेवेवर मनुष्यबळाअभावी कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही, हे विशेष.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील 5 ते 6 महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व धुव्वाधार पाऊस व त्यानंतरचा संततधार पाऊस, पुरपरिस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे वीजयोद्धे सज्ज असतात. मात्र यंदा ही परिस्थिती अधिकच गंभीर होती. त्यातच मार्चपासून कोरोनाचा संकटकाळ सुरु झाला. तथापि, सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयोद्ध्यांनी जीवाचे रान करीत एप्रिल, मे-मधील अवकाळी वादळी पावसाला तोंड देत जलदगतीने कर्तव्य बजावले.

दैनंदिन कामांसोबतच एकीकडे कोरोनाबाधीत रुग्णांसाठी ससूनच्या 11 मजली नवीन इमारतीसाठी केवळ 36 तासांमध्ये नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करणे तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाच्या अभुतपूर्व तडाख्याने प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा जलदगतीने उभारणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी विशेष कामे देखील युद्धपातळीवर अहोरात्र केली आहेत.

पुणे परिमंडलअंतर्गत सर्वच कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच वीजग्राहकांसाठी कोरोनाविषयक उपाययोजनांसह सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होत आहे. कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची थर्मल गनद्वारे प्रवेशद्वारावरच तपासणी केली जात आहे. वीजग्राहकांनी देखील गरजेचे असल्याच कार्यालयात यावे.

महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा मोबाईल अ‍ॅप तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. या सेवांचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.