Pune News : अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचे मदतीचे आश्वासन !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची लवरकच मान्यता मिळण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवण्यासाठी मदत करण्यासंदर्भात डॉ. हर्ष वर्धन यांनी आज (सोमवारी) आश्वस्त केले.

महापौर मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय याबाबत महापौर मोहोळ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचा प्रवास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अंतिम मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. याच अंतिम मंजुरीसाठी आज दिल्लीत विरोधपक्ष नेते फडणवीस यांच्या पुढाकाराने महापौर मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात चर्चा करून मान्यतेसंदर्भात मदत करण्याची विनंती केली. यावेळी स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर आणि आयुक्त विक्रम कुमार हे देखील उपस्थित होते.

विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी हे महाविद्यालय पुणे शहराच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे? याबाबत तर महापौर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत झालेल्या तांत्रिक पूर्ततांची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. तर आरोग्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुरेश चंद्र शर्मा यांचीही भेट घेतली.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठीचा शेवटचा टप्पा पार पडत असून विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी थेट आणि सविस्तरपणे चर्चा करता आली. आपल्या पुणे शहराच्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हे वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरणारे आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या इतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे, ही पुणेकरांसाठी समाधानाची बाब आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातच प्रवेश द्यायला सुरुवात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.