Pune News: आद्य क्रांतिकारकांना दीपोत्सवातून अनोखी मानवंदना

वासुदेव बळवंत फडके यांची 175 वी जयंती ; इतिहास प्रेमी मंडळातर्फे 500 दीप प्रज्वलित

एमपीसी न्यूज – आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त तब्बल 500 दिव्यांनी साकारलेल्या दीपोत्सवातून त्यांना पुण्यात अनोखी मानवंदना देण्यात आली.

संगम पूल आणि इंजिनिअरींग कॉलेजच्याजवळ सीआयडी ऑफिसच्या आवारात वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक आहे. तेथे ब्रिटीशकाळात न्यायालय होते, त्यावेळी त्यांच्यावर येथे खटला चालला होता आणि त्यांना जन्मठेपेची देखील शिक्षा सुनावण्यात आली. त्या जागेतील स्मारकात दीप प्रज्वलित करण्यात आले.

इतिहास प्रेमी मंडळातर्फे इंजिनिअरींग कॉलेजच्याजवळ सीआयडी ऑफिसच्या आवारात त्यांच्या स्मारकासमोर ही मानवंदना देण्यात आली. यावेळी क्रांतिकारक चरित्रलेखक कृ.पं.देशपांडे, कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांसह फडके स्नेहवर्धिनीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कृ.पं.देशपांडे म्हणाले, क्रांतिकारक फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी पनवेल जवळील शिरढोण येथे झाला. पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने रहात असतानाच इंग्रजांच्या विरोधात त्यांच्या मनात क्रोध निर्माण झाला. स्वदेशी वस्तूंचा वापर, सार्वजनिक सभेचे कार्य, स्वदेशी उद्योगधंदे, राष्ट्रीय शिक्षण देणा-या शाळांची स्थापना अशा अनेक कार्यांत ते सहभागी होते.

मोहन शेटे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीला पर्याय नाही, हे लक्षात आल्यानंतर रामोशी समाजाला साथीला घेऊन वासुदेव फडके यांनी बंड पुकारले. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांना पकडून देणा-यास त्याकाळी चार हजार रुपये इनाम जाहीर करण्यात आले होते. मेजर डॅनियल याने त्यांना अटक केली. त्यांच्यावर संगम पूलाजवळ याच जागेत खटला चालविण्यात आला.

तो ऐकण्यास त्यांचे वडिल, गुरु लहुजी वस्ताद यांसह शेकडो लोक जमत आणि त्यांचा जयजयकार करीत होते. शेवटी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भारतापासून दूर एडनच्या कारागृहात 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापासून चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.