Pune News Update: मुठा नदीत वाहून गेलेल्या त्या तरुणांचा शोध नाही, तीन तासानंतर शोधकार्य थांबवले

एमपीसी न्यूज – सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने मुठा नदीत दोन तरुण वाहून गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली होती. अग्निशमन दलाचे जवान तीन तासांपासून या तरुणांचा मोठा नदीपात्रात शोध घेत होते. परंतु रात्र वाढल्याने आणि पाण्याचा वेग वाढल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी हे शोधकार्य थांबवले आहे. सकाळी पुन्हा एकदा या तरुणांचा शोध घेतला जाणार आहे. 

ओम तुमप्पा तुपधर (वय 18) आणि सौरभ सुरेश कांबळे (वय 20) असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही ताडीवाला रोड परिसरातील राहणारे आहेत. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सौरभ ओम आणि त्याचे दोन मित्र आज सायंकाळच्या सुमारास भिडे पुलाजवळ असणाऱ्या नदीपात्रात जाऊन सेल्फी काढत होते. यावेळी यातील एक जण पाय घसरल्याने वाहून जावू लागला. त्याला वाचवण्यासाठी सौरभ कांबळे गेला असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मागील तीन तासांपासून त्यांनी मुठा नदी पात्रात या दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांचाही शोध अद्याप तरी लागला नाही. रात्र झाल्याने आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने सध्या शोध कार्य थांबविण्यात आले आहे. सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.