Pune News : भाजप राजवटीत पुण्याचा नागरी विकास पूर्णपणे ठप्प : आबा बागुल

एमपीसीन्यूज : गेल्या पाच वर्षात पुण्याचा नागरी विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. असे असूनही सध्याचे सत्ताधारी भाजपकडून 72 ब कलमाचा वापर करून मोठे मोठे प्रकल्प जाहीर करून कामाचा धूमधडाका सुरू आहे. ७२ ब कलमाचे पुणे महापालिकेत खेळणे केले आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी संताप व्यक्त केला.

पुणे शहराच्या तातडीच्या प्रश्नांबाबत कोणतीही  कामे होत नाहीत. उलट हजारो कोटी रुपयांचे मोठे प्रोजेक्ट सुरू करण्याचे आश्वासन देऊन सत्ताधारी भाजप पुणेकरांची फसवणूक करत आहे.

यावर्षी पुणेकरांनी निवडून दिलेल्या सभासदांनी सुचविलेल्या कामांपैकी ३० टक्के कामे करण्यात येणार असून ही कामे 100 टक्के करण्यासाठी 72 ब कलमाचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न उभा राहत आहे. या कामांमधून पुणे शहराचा विकास होणार नाही का ?. केवळ मोठ्या प्रकल्पातूनच विकास होणार आहे ?. निवडणूक जवळ आलेली असताना पुण्याचे मूलभूत नागरी प्रश्न सोडविण्याकरिता 72 ब कलमाचा वापर करून त्यासाठी विकासाचा निधी खर्च का करत नाही, असा प्रश्न सर्वसाधारण पुणेकरांना पडला आहे.

पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट झालेली अकरा गावे व नुकतीच समाविष्ट झालेली 23 गावे यांच्या विकासाचा देखील विचार सत्ताधारी भाजपने केला आहे काय ? हा प्रश्न विचारावा वाटतो. तेथे देखील 72 ब चा वापर करण्यात येणार आहे याचा देखील खुलासा त्यांनी करावा. वास्तविक 11 गावांचा विकास आराखडा अजून तयार झालेला नाही. तो देखील राज्य सरकार की पुणे महानगरपालिका करणार हा देखील प्रश्न अधांतरीच आहे.

अश्यातच महापालिकेत 23 गावांचा समावेश नव्याने झाला असल्याने त्यांच्या विकास आराखड्याचे काय? तो कधी होणार कोण करणार? आणि त्यासाठी पुणे महानगरपालिका कोणत्या प्रकारचा निधी खर्च करणार मुळात असा निधी आहे काय? आणि मूळ पुणे शहराच्या विकासात बाधा न आणता या 11 व 23 गावांचा विकास करायला हवा अशी सर्वसाधारण भावना पुणेकरांमध्ये आहे. ती योग्यच आहे. मग त्यासाठी 72 ब कलमाचा वापर करून 11 व 23 गावांमध्ये विकासकामे का सुरू केली जात नाहीत, असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात कोरोना आणि महागाईचे संकट, पेट्रोल,डिझेल, गॅस दरवाढ, बेकारी अश्या विविध प्रश्नांनी गांजलेल्या पुणेकरांचे लक्ष नाही हे ध्यानात घेऊन 72 ब कलमाचा सर्रास वापर करीत गरजेची नसणारी कामे सत्ताधारी भाजप करीत आहे. याचे गौडबंगाल जनतेसमोर आले पाहिजे.

विशेषतः 72 ब कलमाखाली अशी दीर्घकालीन कामे सुरू करताना तत्कालीन पुणे शहराच्या गरजांकडे दूर्लक्ष करणे हे पूर्णतः अयोग्य असून 72 ब कलमाखाली याही कामांची तातडीने सुरुवात करावी व पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी बागुल यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपने या मागण्यांकडे लक्ष नाही दिले तर पुण्याच्या विकासाचा प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा बागुल यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.