Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेत्यांची तातडीने अधिकृत बैठक घ्या : आबा बागुल

एमपीसी न्यूज – गेल्या चार महिन्यांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहराच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय चर्चाकरून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण फक्त महापौरांशी चर्चा करून वेगवेगळे निर्णय घेता त्यास आम्ही सर्व पक्ष समर्थन देत आलेलो आहोत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी कोणत्याही पक्षाची अधिकृत बैठक घेऊन चर्चा केलेली नाही. ऑनरेकॉर्ड चर्चा न केल्याने उद्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याची सर्व जबाबदारी आपली व खात्याची राहिल. यासाठी पक्ष नेत्यांची तातडीने अधिकृत बैठक घ्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे मंगळवारी केली.

याबाबत बागुल यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे शहराच्या हितासाठी कामकाजाच्या वेळेप्रमाणे सर्व पक्षनेते आपला वेळ देण्यास तयार असून त्यांची अधिकृत बैठक घेऊन त्याचे मिनिट्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

अशी बैठक होत नसल्याने विरोधी पक्षांकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठोस मुद्दे व काही सूचना असतात. ते मुद्दे व सूचनांची अनधिकृतपणे चर्चा केली जाते.

परंतु, अनधिकृतपणे केलेल्या चर्चेला काहीही महत्व नाही. अधिकृतरीत्या त्याचा अजेंडा काढून त्याचे अधिकृत मिनिट्स नोंद करून निर्णय घेणे हे सभा कामकाज नियमावली व महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट नुसार बंधनकारक आहे. नगरसचिवांनी कार्यपत्रिका जाहीर करून हे विषय अजेंड्यावर घेऊन त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे असते.

आपण नवीन आयुक्त असल्याने आपल्याला कामकाजाची माहिती होण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो. परंतु, तत्कालीन आयुक्तांप्रमाणे आपण देखील अशी मिटिंग घेत नाही हे योग्य नाही. पुणे शहराच्या हितासाठी आपल्याकडून चांगले निर्णय अपेक्षित असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पक्षनेत्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही बागुल म्हणाले.

इंडियन मेडिकल असोसिएशनप्रमाणे पुणे शहरात 4335 डॉक्टर आहेत. एवढे डॉक्टर असूनही आपला योग्य समन्वय नसल्यामुळे सर्व डॉक्टर काम करताना दिसत नाहीत. शहरात कोरोना रुग्णांसाठी 5000बेडची क्षमता आहे. 4335 डॉक्टर असताना शहरात कोरोनामुळे एकही नागरिकाचा बळी गेला जायला नको होता.

मात्र, शहरात एवढे डॉक्टर असताना चुकीच्या व्यवस्थापनामुळे नागरिकांचे कोरोनाने मृत्यू होत आहे, ही गंभीर बाब आहे. याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी देखील पक्षनेत्यांच्या बैठकी होणे गरजेचे आहे. यासाठी त्वरित आपण पक्षनेत्यांची बैठक घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बागुल यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.