Pune News: उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा; राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे यांचा प्रस्ताव

पुणे शहराचा संपूर्ण कचरा गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपोत टाकला जातो.

एमपीसी न्यूज – उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि.15) सकाळी चर्चा होणार आहे.

या कचरा डेपोच्या जागी हॉस्पिटल, ई – लर्निंग स्कूल, मैदानासारख्या लोकपयोगी प्रयोजनाकरिता वापरावी, असेही ढोरे यांनी म्हटले आहे. पुणे शहराचा संपूर्ण कचरा गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपोत टाकला जातो. या कचरा डेपोमुळे वायूप्रदूषण, जलस्रोत प्रदूषण, वाहतूक कोंडी, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

हा कचरा डेपो बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टप्याटप्याने हा कचरा डेपो पूर्णतः बंद करून पर्यायी जागा कबूल केले होते. सद्यस्थितीत मनपा प्रशासन राज्य शासनाने देऊ केलेली जागा ताब्यात घेण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न करत नाहीत.

उलटप्रश्नी उरुळी देवाची, फुरसुंगी येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करून 15 वर्षे चालविण्याचे नियोजन करत आहे. मे. भूमी ग्रीन एनर्जी ठेकेदारासोबत कचरा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करत आहे.

हरित लवाद आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत दररोज शेकडो मे. टन कचरा डम्पिंग करीत आहेत. त्याला ग्रामस्थांचा विरोध असल्याचेही गणेश ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.