Pune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – संत साहित्याचे गाढे अभ्यासक वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात (वय 80) यांचे कोरोनामुळे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान आज निधन झाले. त्यांच्यावर जवळपास 3 आठवडे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

वा. ना. उत्पात हे हिंदुत्वावादी होते. अतिशय प्रखरपणे विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. उत्पात यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते.

त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. ते येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली आहे.

भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून सावरकर क्रांती मंदिराची भव्य वास्तू त्यांनी उभारली. त्यांच्या मागे चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कोरोनाच्या आजाराने पंढरपूरची कधीही भरून न निघणारी हानी केली आहे. पंढरपुरातील अनेक मान्यवर व्यक्तींना कोरोनाविरुद्ध लढाईत आपला जीव गमवावा लागला आहे.

माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह. भ. प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर आणि आता वा. ना. उत्पात यांचेही कोरोनाने निधन झाले. त्यामुळे पंढरपूरमध्ये शोककळा निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.