Pune News : नाट्य व संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत निर्मला गोगटे यांना 2020 चा बालगंधर्व पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी बालगंधर्व पुरस्कार देण्यात येतो. परंतु सन 2020 मधील कोरोना महामारीच्या संकटामुळे बालगंधर्व पुरस्काराचे वितरण होऊ शकले नाही. 26 जून रोजी बालगंधर्वांची जयंती साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन 2020 व सन 2021 च्या बालगंधर्व पुरस्कारांची घोषणा आज मा. महापौर यांनी केली.

या पुरस्कारासाठी पदाधिकारी व पक्षनेते तसेच निवड समितीची बैठक आज बुधवार, दि. 23 जून 2021 रोजी महापौर कार्यालय येथे पार पडली. या बैठकीस महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस पक्षनेते उल्हास उर्फ आबा बागुल, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार, मनसे पक्षनेते साईनाथ बाबर, आर.पी.आय. पक्षनेत्या फरजाना अय्युब शेख, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्‌धे यांच्या समवेत माजी आमदार उल्हास पवार, अनुराधा राजहंस,  डॉ.सतिश देसाई,  शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसैन खान आदी निवड समिती सदस्य उपस्थित होते.

सन 2020 चा बालगंधर्व मुख्य पुरस्कार नाट्य आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला आहे. तर मुख्य पुरस्काराबरोबरच चित्रपट व नाट्य क्षेत्रातील लेखन व दिग्दर्शनासाठी ‘किरण यज्ञोपवित’ नाटय व्यवस्थापनासाठी ‘प्रवीण बर्वे’,  रंगमंच व्यवस्थापनासाठी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून ‘संदीप देशमुख’, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलाकार ‘रविंद्र कुलकर्णी’ आणि बालगंधर्वांचा ठेवा जतन करुन, विविध नाट्यसंम्मेलनात प्रदर्शन भरवून, त्यांची आठवण नवीन पिढा करुन देण्यासाठी ‘अनुराधा राजहंस’ यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

सन 2021 चा बालगंधर्व मुख्य पुरस्कार शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यास गायिका डॉ. रेवा नातू यांना जाहीर झालेला आहे. मुख्य पुरस्काराबरोबरच व्हायोलिन क्षेत्रातील शिक्षिका व कलाकार ‘रमा चोभे’, नाटय क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी ‘श्री. समीर हंपी’, बहुआयामी नाटयकर्मी ‘प्रसाद वनारसे’, बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून ‘गणेश माळवदकर’, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजनाकार तसेच बॉक्स थिएटरच्या निर्मितीसाठी ‘प्रविण वैद्य’ यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

15 जुलै रोजी बालगंधर्व यांची पुण्यतिथी असते. त्या धर्तीवर पुढील काळात कोरोना परिस्थितीचा आढावा घेवू न बालगंधर्व पुरस्काराचा वितरण सोहळा गुरुवार, दि. 15 जुलै 2021 रोजी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार असे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.