Pune News: हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास ‘असा’ असेल दंड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासाठी जाहीर केलेले मानक कार्यप्रणालीचा भंग केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाबाबत तसेच परवाना निलंबनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार मानक कार्यप्रणालीचा पहिल्या वेळी भंग झाल्यास 2,500 रुपये, दुसऱ्या वेळी 5,000 रुपये तर तिसऱ्या वेळी 7,500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून त्यासोबतच संबंधित व्यावसायिकाचा परवाना आवश्यक त्या कालावधीसाठी निलंबित करण्याचा अधिकारही सक्षम प्राधिकारी यांना देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र शासनाने 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना मार्गदर्शक सूचना (SOP) अटी ब मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हॉटेल,बार, रेस्टॉरंट चालू करणेस परवानगी दिलेली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, फूडकोर्ट सुरु करण्याकरिता राज्य शासनाच्या  आदेशाचे अनुषंगाने आदेश व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांचे (SOP) काटेकोरपणे पालन करून संबंधित आस्थापनांनी आपला व्यवसाय करणे बंधनकारक आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट व्यवसाय करताना कोरोना (कोविड-19) चा प्रसार होणार नाही, संसर्ग वाढणार नाही याबाबत संपूर्णपणे दक्षता घ्यावयाची आहे. पुण्याचे विभागीय आयुक्तांच्या आदेशाने पुणे महानगपालिका क्षेत्रामध्ये संबंधित व्यवसायिकाकडून आदेशाचा भंग झाल्यास, सदर आदेशाचे (SOP) काटेकोरपणे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडाची आकारणी करण्याचे अधिकार हे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेने या बाबत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

विहित मानक कार्यप्रणालीचा (SOP) चा भंग प्रथमत: निदर्शनास आल्यास दंडाची रक्कम 2,500 रुपये असेल द्वितीय भंगाच्या वेळी दंडाची रक्कम 5,000 रुपये असेल, तर तिसऱ्यांदा SOP चा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास रक्कम रु. 7,500 रुपये आकारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या दंडात्मक कारवाईसोबतच हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसेल व कोविड-19 संसर्ग वाढण्यास मदत होत असेल अशा व्यवसायिकांच्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट चा परवाना आवश्यक त्या कालावधीसाठी निलंबित करण्यासाठी प्रकरणानुसार सक्षम प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांविरुद्ध दंडाची आकारणी करण्याचे अधिकार पुणे महापालिकेतील कार्यरत सर्व उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख आरोग्य निरीक्षक, उप मुख्य आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरीक्षक, मेंटेनन्स सर्वेअर व कार्यालयीन अधीक्षक यांना देण्यात आले आहेत तसेच सदरच्या कारवाईचे प्रभावी व कडक परिणाम होण्याच्या दृष्टीने हे अधिकार पोलिसांना देखील देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.