Pune News: कोरोनाच्या संकट काळात विशाल तांबे रात्रंदिवस नागरिकांच्या मदतीला

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. या काळात केवळ घरातच बसून न राहता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विशाल तांबे हे धनकवडी परिसरातील नागरिकांच्या मदतीला रात्रंदिवस धावून जात आहेत.

कोरोनाचे संकट इतक्यात कमी होणार नाही, मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. त्यासाठी सातत्याने प्रभागात जनजागृती सुरू आहे. सोबतच पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ हॉस्पिटलवर कारवाई करून काहीही होणार नाही. त्यांना विश्वासात घ्यायला हवे, अशी मागणी ते करीत आहेत. सत्ताधारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत आहेत, मात्र हे संकट काही कमी झालेले नाही. हॉस्पिटलमध्ये एकेका बेडसाठी नगरसेवकांना झगडावे लागत आहे. त्या प्रश्नावरून विशाल तांबे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात ‘हल्लाबोल’ केला आहे.

गरजू आणि गरीब नागरिकांना कोरोना चाचणीसाठी आर्थिक मदत 

लॉकडाऊनच्या सुरुवातीला नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर विशाल तांबे यांनी भजनी मंडळ, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी वेळोवेळी संवाद साधण्यावर भर दिला. खाजगी रुग्णालयात गरजू आणि गरीब नागरिकांची टेस्ट करून घेण्यासाठी तांबे यांनी आर्थिक मदतही केली.

लॉकडाऊनच्या काळात व्यापारी, नागरिक, पोलीस, महावितरण, पुणे महापालिका यांच्यात समन्वय राखण्यासाठी विशाल तांबे नियमितपणे प्रयत्न करीत आहेत. धनकवडी येथील स्व. विलासराव तांबे दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

प्रशासनाशी समन्वयातून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अहोरात्र तत्पर

महापालिका आयुक्त, महापौर, आरोग्य प्रमुख यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी तांबे यांचे अहोरात्र काम सुरूच आहे. रात्री-अपरात्री कधीही कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बेड मिळाला नाही, तर तांबे स्वतः जातीने पाठपुरावा करतात. नगरसेवक म्हटले की, पाणी, वीज, रस्ते, कचरा अशाच समस्या सोडविणे आवश्यक मानले जाते. मात्र, या कामा व्यतिरिक्त आता कोरोनाचे संकट ओळखून तांबे कधीही नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत.

खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियमित संपर्कात राहून नागरिकांना शासकीय मदतही मिळवून दिली आहे. जेष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या नागरिकांना महापालिकेतर्फे मदत असो की, घरपोच औषध, हे काम अखंडपणे सुरू आहे.

प्रभागातील विविध शाळा, कोचिंग क्लास चालक आणि पालकांशी संवाद ठेवून शासनाच्या नियमांचे पालन करून शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना ऑनलाइन देण्यासाठी विशाल तांबे यांनी प्रयत्न केले. कोरोनासंदर्भात भीती निर्माण होऊ नये, यासाठी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून रोज अपडेट माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल केल्याने दुकानांत गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने व्यापाऱ्यांशी तांबे यांचा संवाद सुरू आहे.

धनकवडीत कोविड चाचणी केंद्रासाठी पुढाकार 

धनकवडी परिसर आणि प्रभागातील नागरिकांना कोरोना तपासणीसाठी सिंहगड रोड केंद्र व धायरी केंद्र येथे जावे लागत होते. वेळ, श्रम आणि प्रचंड धावाधाव होत होती. त्याची दखल घेऊन धनकवडी येथील लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे कोविड-19 अँटिजेन स्वॅब चाचणी केंद्र सुरू केले. 40 आरोग्य कर्मचारी येथे कार्यरत आहेत. हजारो नागरिकांची त्या ठिकाणी तपासणी करून घेतली आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 35, 39, 40, 41 मधील सहा लाख नागरिकांना याचा फायदा झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनकवडीत सातत्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, दक्षिण पुणे विभाग आणि पद्मावती भागांत वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्याचे किट, सॅनिटायजर व मास्क वाटप, घरेलू कामगार महिला व प्रभागातील रिक्षावाले यांना गरजेच्या वस्तूंचे किट व मास्क वाटप, गरजू आणि गरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात कोरोनाच्या टेस्टसाठी आर्थिक मदतही विशाल तांबे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.