Pune News : मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी ‘शंख-ढोल नाद’

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते. मात्र, सध्या हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे.  हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा व या दस-याला देवालये भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसह सरकारला जाग यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार, दि. 24 रोजी प्रत्येक मंदिरासमोर शंख ढोल यांचा नाद करून आरतीचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

येत्या दस-याला सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री संजय मुद्राळे, विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शंकर गायकर म्हणाले, दसरा दिवाळीचे महत्व हिंदू समाजासाठी मोठे आहे. दसरा-दिवाळीमध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो. अशा प्रसंगी देवालये उघडी नसतील, तर श्रद्धावान हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील.

गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बँका, सर्व खाजगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहे. सर्व ठिकाणी प्रचंड गर्दीही ओसंडून वाहत आहे.

दस-याला तर व्यायाम शाळा सुरू होत आहेत. परीक्षा देखील घेतल्या जात आहेत. हे सगळे सुरू आहे तर मंदिरांवर सरकार रोष का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.